सासवडमध्ये जुन्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला; १२ जणांसह चार अनोळखी आरोपींवर गुन्हा

Jul 18, 2026 - 13:24
 0  194
सासवडमध्ये जुन्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला; १२ जणांसह चार अनोळखी आरोपींवर गुन्हा

सासवडमध्ये जुन्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला; १२ जणांसह चार अनोळखी आरोपींवर गुन्हा

सासवड | प्रतिनिधी
सासवड शहरातील खंडोबानगर परिसरात जुन्या वादाच्या कारणावरून एका २४ वर्षीय तरुणावर लोखंडी रॉड, दगड आणि लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. १७ जुलै) दुपारी घडली. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सासवड पोलिसांनी १२ जणांसह चार अनोळखी व्यक्तींविरुद्ध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी शुभम यल्लापा गायकवाड (वय २४, रा. तारादत्त पश्चिम, सासवड) यांनी सासवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विठ्ठल विजय खोमणे, राम राठोड, गणेश पवार, जितेंद्र ठोकळे, आर्यन सोळंकी, विरु साळंकी, श्रीनाथ खोमणे, समर्थ खोमणे, गुड्या शेलार, विकास मंडले, दत्ता शेलार, चिक्या भोंडे तसेच चार अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, शुभम गायकवाड हे मोटारसायकलवरून जात असताना अंबाबाई मंदिराजवळ त्यांना अडवण्यात आले. त्यानंतर आरोपींनी शिवीगाळ करत लोखंडी रॉड, दगड व लाकडी दांडक्याने मारहाण केली. या हल्ल्यात त्यांच्या डोक्यासह शरीराच्या विविध भागांना दुखापत झाली.
तक्रारीत आरोपींनी परिसरात दहशत निर्माण करत जिवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे घाबरलेल्या नागरिकांनी घरांचे दरवाजे बंद करून घेतल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३२९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांखाली तसेच फौजदारी कायदा सुधारणा अधिनियम २०१३ च्या कलम ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोडसे करीत असून पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींचा शोध सुरू आहे.
– क्रांतीज्वाला न्यूज

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0